मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फूल

कशी कळी आली तेव्हा  गाल फुगवून  पुन्हा पुन्हा हवे होते  तेच नाकारून  कशी कळी थरथर  पावसांत न्हाली ? नव्हताच मुळी तेव्हा  पाऊस आभाळी  कशी कळी भेटीसाठी  सैरभैर झाली ? अचानक धीट होता  फुलूनच आली.  : फूल  : उत्सव  : मंगेश पाडगांवकर 

दान

त्याचे त्याला देऊन टाक  बाकी ठेवू नको काही : मला देणार होतीस जे  त्याचा हिशोब होणार नाही  देणार होतीस असे काही  आभाळ देखील लाजावे  घेणार होतो असे काही  पृथ्वीनेही बघत राहावे .....  सारे आभाळ सांगण्यासाठी  पाण्यापाशी शब्द कुठे? शब्द आणि अर्थ यांत  घुमी रात्र उभी इथे  गाण्यांमधून वहात राहील  आभाळावेडी तुझी खूण वृत्ती वृत्ती जपत राहील  तुझ्या नेत्रांमधले ऊन  त्याचे त्याला देऊन टाक  बाकी ठेवू नको काही : माझ्यासाठी स्वच्छ ऊन  स्वच्छ स्वच्छ दिशा दाही  : दान  : उत्सव  : मंगेश पाडगांवकर 

किती दिसांनी

जांभुळपिक्या  आल्या ग रात्रीं  स्वप्नांना जुईची जाग  डोळ्यांच्या कडे  बांधून झुला  झुलते कुसुम्बी आग  डोळ्यांत  सुर्मा  घालून झाडें  घेतात जलाचा थांग  सुरांसारखी  उमटे दूर  दिव्यांची हळवी रांग  झरा डोळेभोर  सावल्यांचा हा  पानांनी झाकतो सूर  नाही ग नाही  सोसवत हा  काजवा जवळ...  दूर  जांभुळपिक्या  आल्या ग रात्रीं  थरारे कोवळे गीत  किती दिसांनी  पुन्हा ये भरा  बावऱ्या डोळ्यांची प्रीत  : किती दिसांनी  : उत्सव  : मंगेश पाडगांवकर 

चंद्र

दुःख कधीच संपले  सुकलेल्या चांदण्यांचे  क्लेश उरले नाहीच  निबर या पापण्यांचे  याच कोवळीकतेसाठी  केला होता खटाटोप : पण चंद्र करपला  मोडे अर्ध्यावर झोप  हसण्याच्या आड पण  कधी तरी चंद्र रडे  कमावलेल्या गाण्यांमध्ये  वारा कण्हत ओरडे  : चंद्र  : उत्सव  : मंगेश पाडगांवकर 

नाही विसरता येत

 नाही विसरता येत  रक्त - उकळीची मिठी  पंख पंख झाली दिठी  नाही विसरता येत  प्राणभरतीची हाक  भोवऱ्याची आणभाक  नाही विसरता येत  झेप आंधळ्या उडीची  घडी आभाळंबुडीची  नाही विसरता येत  नसांची ती वाताहत  उशीखाली तुझा हाथ  नाही विसरता येत  पाय ओढणारे पाप  मीच माझा होतो शाप .  : नाही विसरता येत  : उत्सव  : मंगेश पाडगांवकर 

मिटुनी घेतलें

 मिटुनी घेतलें डोळ्यांत तुला  मुळी न कुणाला कळलें काही  रात्र जरी ओसरली तरीही  रात्र मुळी ओसरली नाही   मिटुनी घेतलें ओठात तुला  मुळी ना कळले शब्दानाही  जशी दवांतून रात्र मिटावी  कळू नये पण रात्रीलाही   मिटुनी घेतलें रक्तांत तुला  मोरपिसे बोटांची झाली  मिटल्या डोळ्यांनी ओठाना  त्या रक्ताची शपथ घातली   मिटुनी घेतलें माझ्यात तुला  सर्वस्वाचा जिथे पहारा  तुझ्यात मी ओथंबून बुडालो : गाढ जळांतुन पहाटवारा .  : मिटुनी घेतलें  : उत्सव  : मंगेश पाडगांवकर 

पाखरू

झाड पेटले फुलांनी :  फुटे डहाळीला ऊन  झुलणाऱ्या गवतात  आले आकाश रुजून  दोन कवडसे झाले  पंख जादूच्या तळ्याचे : वाटे उडेल हे पाणी  निळ्या अभ्रकी गळ्याचे  : पाखरू  : उत्सव  : मंगेश पाडगांवकर 

दूर

दूर दूर  या गवताच्या  हिरव्या ओळींपुढे  तळाचा  पूर्णविराम  दूर दूर  तिरप्या शेतांत  चौकोनी उन्हात  गावात कापणारा  ओणवा ठिपका  दूर दूर  अकस्मात उडून  ढग बनलेला  उनाड डोंगर  दूर दूर  धुक्याच्या समुद्रांत  तरंगत जाणारी  क्षितिजाची होडी  दूर दूर  माझ्यापासून मी  दूर ... दूर ...  : दूर  : उत्सव  : मंगेश पाडगांवकर 

सुकतीच्या ओठांवर

सुकतीच्या ओठांवर  पक्षांचा शुभ्र थवा  शब्दांविण झुरण्यापरी  खोल निळी गूढ ...   सुकतीच्या पापणीशी  लाटांच्या आठवणी ...  कलकांतून सूर तसे  थरथरते स्वप्न मनी ...  सुकतीच्या ओठांना  जाणवतो शुभ्रपणा ...  थकलेल्या मातीवर  भरतीच्या गाढ खुणा ...  सुकतीच्या ओठांवर  पक्षांचा शुभ्र थवा  क्षण उडुनी ... स्थिरत पुन्हां  अधिक गूढ करीत हवा ...  : सुकतीच्या ओठांवर  : उत्सव  : मंगेश पाडगांवकर 

उत्सव

तो पहिलावहिला  उत्सव डोळ्यांचा ...  ती अंधाराच्या गाभाऱ्यातील  चंद्रज्योतींची फुले ...  ती मऊ धिटाई... लाख पाकळ्यांची ...  ती नव्यानव्याने  माझीच मला पटलेली  पहिलीवहिली ओळख  आकाशाच्या मोरपिसांखाली ...  हलकेच पहाटेच  पाण्यावर कुजबुजइवली  टपटपलेली  प्राजक्ताची फुलें ...  त्या पाण्याचा सुगंध नाजूक  साठवलेली ज्यांतून  ती अबोध शिरशिर ...  तो पहिलावहिला  उत्सव डोळ्यांचा ...  : उत्सव  : उत्सव  : मंगेश पाडगांवकर