मुख्य सामग्रीवर वगळा

वाटा ...............


वाटा लालगर्द पांगाराच्या फुलांच्या ,
वाटा काळ्याभोर भुसभुशीत ,
वाटा सनयींची मिंड घेणाऱ्या ,
वाटा चढणीच्या दमछाक करणाऱ्या ,
वाटा चपळ खारी ,
वाटा रवंथ करणाऱ्या सुस्त  म्हशी ,
वाटा भाताच्या लोंब्या हुंगीत जाणाऱ्या,
वाटा सरींच्या झिम्मा झेलणाऱ्या,

वाटा पहिल्यावहिल्या भेटीच्या ,
वाटा चांदण्याच्या मिठीच्या,
वाटा काजूच्या मोहराने घमघमलेल्या ,
वाटा भांगातल्या पिंजरेच्या,
वाटा तिरप्या नजरेच्या ,
वाटा मातीच्या वासाच्या ,
वाटा गर्भारशी ,

वाटा बालपणीच्या कोवळी उन्हे जपणाऱ्या ,
वाटा चिंचांनी गाभूळणाऱ्या ,
वाटा हिरव्यागार पुस्तकातल्या पीसासारख्या,
वाटा बोबडकांद्याच्या ,
वाटा अवखळ फांद्यांच्या ,
वाटा आजींच्या गोष्टींसारख्या खिळवणाऱ्या ,
 वाटा पिवळ्या पोकळीच्या भिरभिरणाऱ्या,

वाटा झपाटलेल्या झाडांच्या ,
वाटा गोमटेश्वर माडाच्या ,
वाटा कातरवेळी एकटे परतताना भ्यायलेल्या ,
वाटा न परतण्यासाठी गेलेल्या ,
वाटा आपणहून उंबरठ्याकडे  येणाऱ्या, 
वाटा पायांअगोदर  फुटणाऱ्या ,
वाटा अकारण तुटणाऱ्या ,
वाटा पावलांचा झुगार खेळणाऱ्या ,
वाटा चांदण्याच्या गवतात लोळणाऱ्या ,
वाटा रात्रीच्या हातातल्या सतारीसारख्या , 
वाटा आंधळ्याच्या हातातल्या एकतारीसारख्या,
वाटा आपल्याच तंद्रीत गाणाऱ्या,
वाटा तिऱ्हांइतासारख्या अलिप्तपणे जाणाऱ्या,

वाटा केविलवाण्या म्हाताऱ्या,
वाटा दारुड्या पावलात अडखळणाऱ्या,
वाटा काहीच न शोधणाऱ्या,
वाटा काळोखात मरून पडल्या सापासारख्या ,
वाटा सतत स्व:ताला पारख्या ,
वाटा फाटलेल्या स्वप्नांपाशी रेंगाळणाऱ्या ,
वाटा कड्यावरून कोसळणाऱ्या ,
वाटा शब्दही न बोलणाऱ्या , 
वाटा  कंटाळून चालणाऱ्या,
वाटा वेध लागूनही दिसत नाहीत अश्या ,
वाटा अतर्क्य वेड्यापिश्या ,
वाटा पाण्याजवळून जातानाही तहानलेल्या ,
वाटा प्रांक्त्नाला भेग गेलेल्या ,

वाटा हिशोबी यशाकडे सरपटत जाणाऱ्या ,
वाटा सत्तेच्या मैलांचे दगड मोजणाऱ्या,
वाटा कठोरपणे नाकारलेल्या ,
वाटा लाचार होऊन जवळ केलेल्या ,
वाटा गर्दीतल्या पायांखालच्या एकाकी ,
वाटा झोपड्यांचे फोड आलेल्या ,
वाटा शेकडो वर्षे तुडवल्या जाणाऱ्या,
वाटा पंथर सारख्या त्वेषाने उडी घेणाऱ्या ,
वाटा रक्ताळून सूर्य शोधीत जाणाऱ्या ,

वाटा देवळाजवळ  भजनांनी भिजलेल्या , 
वाटा पहाटेला भिडलेल्या ,
वाटा भोळ्याभाबड्या पाखरांसाठी ,
वाटा मऊ मऊ कोकारांसाठी ,
वाटा माणसांच्या सावलांच्या ,
वाटा न जन्मलेल्या पावलांच्या..........

: मंगेश पाडगावकर  
: भटके पक्षी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे आम्ल जाऊं दे मनींचे; येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य,आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे. राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा; अक्षरा आकार तूझ्या फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा. लोभ जीभेचा जळू दे दे थिजु विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभु दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य ’मी’चे दे धरू सर्वांस पोटी; भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी. खांब दे ईर्ष्येस माझ्या बाळगू तूझ्या तपाचे; नेउं दे तीतून माते शब्द तूझा स्पंदनाचे त्वसृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू; थोर यत्ना शांति दे गा माझिया वृत्तीत बाणू. आण तूझ्या लालसेची; आण लोकांची अभागी; आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन्‌ नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे; घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे; पोळू दे आतून तीते गा अतींद्रियार्थांचे आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी; मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी. काय मागावे परी म्यां तूहि कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन्‌ तूंच घे

शब्द

घासावा शब्द । तासावा शब्द  । तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी  ।। शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा । बेतावेत शब्द  । शास्त्राधारे ।। बोलावे नेमके ।  नेमके , खमंग खमके । ठेवावे भान । देश , काळ, पात्राचे ।। बोलावे बरे । बोलावे खरे । कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।। कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग । जातपात धर्म । काढूच नये ।। थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे । मुद्देसूद बोलणे । हि संवाद  कला ।। शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म , भक्ती । स्वानुभावातून जन्मावा । प्रत्येक शब्द ।। शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल । शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ।। जीभेवरी ताबा । सर्वसूखदाता । पाणी , वाणी , नाणी । नासू  नये ।। : संत तुकाराम 

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती   कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना गहिवर यावा जगास सा - या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर _ गुरु ठाकूर