तळहातावर तुझ्या एकदा
लाल रंग मी
असा पाहिला
गुलाबास जो कधी
समजला नव्हता
तुझ्या कपोलावरी केधवा
लाल रंग मी
असा पाहिला
जो गगनाला कधी गवसला
नव्हता
वक्षावरती तुझ्या एकदा
लाल रंग मी
असा पाहिला
जो पळसाला कधीच सुचला
नव्हता
निरोप नयनी तुझ्या
अखेरी
लाल रंग मी
असा पाहिला
जो सरणासही कधीच रुचला
नसता
: रंग
: वादळवेल
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा