मुख्य सामग्रीवर वगळा

मराठी माती

माझ्या मराठी मातीचा 
लावा ललाटास टिळा 
हिच्या संगाने जागल्या 
दऱ्याखोऱ्यांतील शिळा 

हिच्या कुशीत जन्मले 
काळे कणखर हात 
ज्यांच्या दुर्दम धीराने 
केली मृत्यूवरी मात 

कडे कपारीत उभी 
हिच्या शिवाची देवळे 
तेज सरितांमधून 
स्वाभिमानाचे ओहळे 

माझ्या मराठी मातीला 
नका म्हणू हीन दीन 
स्वर्गलोकाहून थोर 
मला हिचे महिमान 

दिवा झोपडीत मंद 
पेटे त्यावर मशाल 
तिच्या दीप्तीने उजळे 
घर देशाचे विशाल 

रत्नजडीत अभंग 
ओवी अमृताची सखी 
चारी वर्णातून फिरे 
सरस्वतीची पालखी 

येथे देवाचे मंदिर 
नाही श्रीमंत सोनेरी 
हिच्यासाठी रमापती 
राहे वाळवंटावरी 

रसरंगात भिजला 
येथे श्रुंगाराचा स्वर 
येथे अहंता द्रवली 
झाले वसुधेचे घर 

माझ्या दरीद्री मातीचा 
नका करू अवमान 
हिच्या दारीद्रात आहे 
भविष्याचे वरदान 

येथे फडकला झेंडा 
विळ्याकोयत्यांच्यासाठी 
खड्ग खंबीर राहिले 
सदा कंगालाच्या पाठी 

नाही पसरला कर 
कधी मागायास दान 
स्वर्णसिंहासनापुढे 
कधी लवली न मान 

हिच्या गगनांत घुमे 
आद्य स्वातंत्र्याची द्वाही 
हिच्या पुत्रांच्या बाहूत 
आहे समतेची ग्वाही 

अन्यायाची मुलतानी 
कधी हिने न साहिली 
आहे मृत्युच्या दाराशी 
हिच्या श्रद्धेची हवेली 

माझ्या मराठी मातीचा 
लावा ललाटास टिळा 
हिच्या संगे जागतील 
मायदेशांतील शिळा . 

: मराठी माती 
: मराठी माती 
: कुसुमाग्रज 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे आम्ल जाऊं दे मनींचे; येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य,आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे. राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा; अक्षरा आकार तूझ्या फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा. लोभ जीभेचा जळू दे दे थिजु विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभु दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य ’मी’चे दे धरू सर्वांस पोटी; भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी. खांब दे ईर्ष्येस माझ्या बाळगू तूझ्या तपाचे; नेउं दे तीतून माते शब्द तूझा स्पंदनाचे त्वसृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू; थोर यत्ना शांति दे गा माझिया वृत्तीत बाणू. आण तूझ्या लालसेची; आण लोकांची अभागी; आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन्‌ नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे; घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे; पोळू दे आतून तीते गा अतींद्रियार्थांचे आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी; मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी. काय मागावे परी म्यां तूहि कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन्‌ तूंच घे

शब्द

घासावा शब्द । तासावा शब्द  । तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी  ।। शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा । बेतावेत शब्द  । शास्त्राधारे ।। बोलावे नेमके ।  नेमके , खमंग खमके । ठेवावे भान । देश , काळ, पात्राचे ।। बोलावे बरे । बोलावे खरे । कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।। कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग । जातपात धर्म । काढूच नये ।। थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे । मुद्देसूद बोलणे । हि संवाद  कला ।। शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म , भक्ती । स्वानुभावातून जन्मावा । प्रत्येक शब्द ।। शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल । शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ।। जीभेवरी ताबा । सर्वसूखदाता । पाणी , वाणी , नाणी । नासू  नये ।। : संत तुकाराम 

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती   कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना गहिवर यावा जगास सा - या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर _ गुरु ठाकूर